महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२५ दरम्यान नाशिक येथे झालेल्या गंभीर गैरप्रकारावर शिक्षण विभाग आणि राज्य परीक्षा परिषद अद्याप मौन बाळगून असल्याचा आरोप परीक्षार्थी उमेदवारांकडून केला जात आहे. २३ डिसेंबर रोजी राज्यभर टीईटी परीक्षा पार पडली. मात्र नाशिकच्या सीडीओ मेरी केंद्रावर जवळपास साडेतीनशे इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना चुकून मराठी माध्यमाची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला.

परीक्षेच्या सुरुवातीलाच उमेदवारांनी ही चूक परीक्षा केंद्र प्रमुखांच्या निदर्शनास आणून दिली होती. तरीही तीन तासांच्या परीक्षेपैकी सुमारे अडीच तास केवळ प्रश्नपत्रिका बदलून दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. अखेर उरलेल्या अर्ध्या तासातच उमेदवारांना उपलब्ध असलेलीच प्रश्नपत्रिका सोडवावी लागली. या प्रकाराचा सविस्तर अहवाल त्याच दिवशी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत राज्य परीक्षा परिषदेला पाठवण्यात आला होता.
या प्रकरणी परीक्षा केंद्र प्रमुख आणि पर्यवेक्षकांची चौकशीसाठी पुण्यातील परीक्षा परिषद मुख्यालयात चौकशीही करण्यात आली असून अहवाल तयार झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तीन आठवडे उलटूनही संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही किंवा अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे हा प्रकार दडपला जाणार की काय, अशी शंका परीक्षार्थी उमेदवार व्यक्त करीत आहेत.
चुकीची प्रश्नपत्रिका मिळालेल्या उमेदवारांनी पुन्हा परीक्षा न घेता या परीक्षेत उत्तीर्ण घोषित करण्याची मागणी राज्य परीक्षा परिषदेपुढे ठेवली आहे. मात्र जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून किंवा परीक्षा परिषदेकडून याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. आठवडाभरात निर्णय जाहीर केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते, परंतु तीन आठवडे उलटूनही निर्णय प्रलंबित असल्याने उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

Comments are closed.