छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2025 चा अंतिम निकाल जाहीर केला असून, राज्यभरातून दोन्ही पेपर मिळून ४ लाख ४६ हजार ७३० उमेदवारांपैकी ५० हजार ३६९ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.

यंदा उत्तीर्णतेचे एकूण प्रमाण ११.२८ टक्के असून, मागील वर्षाच्या तुलनेत निकालात थोडी वाढ झाल्याचे चित्र आहे. ही परीक्षा २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात आली होती, तर डिसेंबरमध्ये उत्तरसूची जाहीर करून ३ फेब्रुवारी रोजी अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला.
‘पेपर-१’ (प्राथमिक स्तर) साठी १ लाख ९० हजार ९०१ उमेदवार बसले होते. त्यापैकी २१ हजार ८९२ उमेदवार उत्तीर्ण होऊन शिक्षक होण्यासाठी पात्र ठरले आहेत. या पेपरमध्ये १ लाख ६८ हजार ९९३ उमेदवार अनुत्तीर्ण झाले असून, १६ उमेदवारांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.
‘पेपर-१’चा निकालाचा दर ११.४७ टक्के आहे. तर ‘पेपर-२’ (उच्च प्राथमिक स्तर) साठी २ लाख ५५ हजार ८२९ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २८ हजार ४७७ उमेदवार उत्तीर्ण झाले असून, २ लाख २७ हजार ३३२ उमेदवार अनुत्तीर्ण ठरले आहेत. या पेपरमध्ये २० उमेदवारांचे निकाल राखीव आहेत.
टीईटी परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू यांसह एकूण आठ भाषा माध्यमांतून घेण्यात आली होती. मराठी माध्यमातून ‘पेपर-१’ देणाऱ्या १ लाख ३४ हजार ६८० उमेदवारांपैकी १६ हजार १९० उमेदवार उत्तीर्ण झाले. उर्वरित सात माध्यमांतील ५६ हजार २२१ उमेदवारांमध्ये हिंदी माध्यमाचा उत्तीर्णतेचा दर सर्वाधिक १२.१९ टक्के नोंदवला गेला.
‘पेपर-२’मध्ये गणित व विज्ञान विषयाचा निकाल तुलनेने कमी लागला असून, या विषयासाठी ९५ हजार ७८२ उमेदवार बसले होते, त्यापैकी केवळ ८ हजार ७३७ उमेदवार उत्तीर्ण झाले. या विषयाचा निकालाचा दर ९.१२ टक्के आहे. सामाजिकशास्त्र विषयात मात्र १ लाख ६० हजार ४७ उमेदवारांपैकी १९ हजार ४९४ उमेदवार उत्तीर्ण झाले असून, या विषयाचा निकालाचा दर १२.३३ टक्के आहे.
एकूणच, राज्यभरात दोन्ही पेपर मिळून ५० हजारांहून अधिक उमेदवार शिक्षक पात्र ठरले असून, यंदाचा टीईटी निकाल ११ टक्क्यांच्या पुढे गेला आहे.

Comments are closed.