उच्च शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून महाडीबीटी (MahaDBT) वेबसाइटवर राबवण्यात येणाऱ्या १४ शिष्यवृत्ती योजनांना अपेक्षेपेक्षा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. जून महिन्यात अर्ज प्रक्रिया सुरू होऊनही आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जांची संख्या समाधानकारक नसल्याने, १० जानेवारीपर्यंत विशेष मोहीम राबवून अधिकाधिक विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे निर्देश उच्च शिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक डॉ. अशोक उबाळे यांनी दिले आहेत.

शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेला गती देण्यासाठी महाविद्यालयीन लिपिकांनी प्राप्त ऑनलाईन अर्जांवर विलंब न करता कार्यवाही करावी, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रे प्राप्त होताच शिष्यवृत्तीचे अर्ज तात्काळ ऑनलाईन भरून, पात्र अर्ज महाविद्यालय स्तरावर मंजूर करून संबंधित विभागाकडे ठरलेल्या कालमर्यादेत पाठवावेत, असेही सूचित करण्यात आले आहे.
याशिवाय, विद्यापीठे व महाविद्यालयांनी १० जानेवारीपर्यंत विशेष मोहीम राबवून विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात येणाऱ्या अडचणींबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करावे. या कालावधीत महाविद्यालयातील समन्वयक अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून अधिकाधिक अर्ज भरून घेऊन ते मंजुरीसाठी वेळेत पाठवावेत, असेही डॉ. उबाळे यांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

Comments are closed.