आरटीई प्रवेशाला मंद प्रतिसाद; अंतर नियम बदलामुळे पालकांमध्ये संभ्रम! | Low Response to RTE Admissions This Year!

Low Response to RTE Admissions This Year!

शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के आरक्षित जागांसाठी सुरू असलेल्या आरटीई ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला यंदा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. दरवर्षी सर्वाधिक अर्ज करणाऱ्या पुणे जिल्ह्यातही यावेळी कमी अर्ज प्राप्त झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील ९०५ शाळांमधील १७,५०९ जागांसाठी केवळ १६,७५२ अर्ज आले आहेत.

Low Response to RTE Admissions This Year!

राज्यातील ८,६५१ शाळांमधील एकूण १,१२,७७२ जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून २५ फेब्रुवारीपर्यंत ८५,९१० अर्ज प्राप्त झाले आहेत. अमरावती आणि नागपूर वगळता बहुतांश जिल्ह्यांत प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज आले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १० मार्चपर्यंत आहे.

यंदा शालेय शिक्षण विभागाने नियमात केलेल्या बदलामुळे हा प्रतिसाद घटल्याची चर्चा आहे. पूर्वी विद्यार्थ्यांच्या घरापासून तीन किलोमीटरपर्यंतच्या शाळांमध्ये अर्ज करता येत होता; मात्र आता ही मर्यादा केवळ एक किलोमीटरपर्यंत करण्यात आली आहे. अनेक भागांत एक किलोमीटर परिसरात शाळाच उपलब्ध नसल्याने पालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी इच्छुक असलेल्या पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आरक्षित जागा मोठ्या प्रमाणावर असल्या तरी मूलभूत सुविधांच्या अभावामुळे पालकांचा कल खासगी इंग्रजी माध्यमाकडे आहे. ग्रामीण भागात तर घराजवळ योग्य शाळा उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. परिणामी, अनेक जिल्ह्यांत प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्याचे स्पष्ट होत आहे.

Comments are closed.