दहावी व बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणाऱ्या ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमाला महाराष्ट्रातून अपेक्षेपेक्षा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. राज्यातून ६५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी अपेक्षित असताना, २ जानेवारीपर्यंत केवळ ८ लाख १५ हजार ४७५ विद्यार्थ्यांनीच नोंदणी केल्याने शिक्षण संचालनालयाची चिंता वाढली आहे. त्यामुळे ही नोंदणी वाढविण्यासाठी राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना तातडीचे आदेश देण्यात आले आहेत.

गेल्या नऊ वर्षांपासून दहावी व बारावीच्या परीक्षेपूर्वी पंतप्रधान विद्यार्थ्यांशी परीक्षेतील ताणतणाव, मानसिक आरोग्य आणि अभ्यासातील अडचणींबाबत संवाद साधतात. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी बंधनकारक असून, यंदा ही नोंदणी १ डिसेंबर २०२५ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत सुरू आहे. मात्र महिनाभर उलटूनही अपेक्षित नोंदणी न झाल्याचे शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. यंदा महाराष्ट्राला ६५ लाख २६ हजार ९९९ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
परभणीत सर्वात कमी, पुण्यात सर्वाधिक नोंदणी
राज्यातील परभणी जिल्ह्यातून सर्वात कमी प्रतिसाद मिळाला असून, येथे केवळ ३ हजार ४३९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक ६७ हजार ६८८ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. नाशिक विभागातील आकडेवारीनुसार नाशिक जिल्ह्यातून २८,०५१, जळगाव २३,२३५, नंदुरबार २३,४३५ आणि धुळे जिल्ह्यातून ९,७९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
वरिष्ठांची नाराजी, अहवाल मागविणार
गेल्या वर्षाच्या तुलनेत तसेच दिलेल्या उद्दिष्टाच्या मानाने नोंदणी अत्यल्प असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे नोंदणी वाढविण्यासाठी कोणती कार्यवाही करण्यात आली, याचा सविस्तर अहवाल शिक्षण संचालनालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत मुख्याध्यापक, प्राचार्य, क्षेत्रीय निरीक्षक तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या उपक्रमासाठी ५१ हजार ५९ शिक्षक आणि १७ हजार ७४४ पालकांनीही नोंदणी केली आहे. खासगी शिक्षण संस्था आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असून, विद्यार्थी व पालकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Comments are closed.