‘नर्सिंग’ अभ्यासक्रमाला अल्प प्रतिसाद; खासगी महाविद्यालयांच्या साडेपाच हजार जागा रिक्त! | Low Response to Nursing Course Vacancies!

Low Response to Nursing Course Vacancies!

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (CET Cell) तब्बल चार ते पाच महिने चाललेली बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अखेर पूर्ण झाली असली, तरी या अभ्यासक्रमाला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला दिसून येत नाही. राज्यभरात पहिल्या वर्षाच्या ५ हजार ५७३ जागा रिक्त राहिल्या असून, एकूण १० हजार ९५७ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.

Low Response to Nursing Course Vacancies!

सीईटी सेलने जुलै महिन्यात बी.एस्सी. नर्सिंग प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी सुरू केली होती. चार नियमित फेऱ्या आणि तीन संस्थास्तरीय फेऱ्यांद्वारे ही प्रक्रिया ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान सुरू होती. इतका दीर्घ कालावधी देऊनही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्याने शैक्षणिक वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रम चालवणारी एकूण २९४ महाविद्यालये असून, त्यापैकी १७ शासकीय आणि २७७ खासगी आहेत.

यंदा ७ व ८ एप्रिल रोजी सीईटी सेलमार्फत प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी ४७ हजार ५०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी ४३ हजार १९१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. प्रारंभी ३१ ऑक्टोबर रोजी प्रवेश प्रक्रिया संपुष्टात आली, मात्र संबंधित महाविद्यालयांच्या मागणीनुसार सीईटी सेल आणि नर्सिंग कौन्सिलने दोन महिन्यांची मुदतवाढ दिली होती.

राज्यात बी.एस्सी. नर्सिंगसाठी शासकीय महाविद्यालयांमध्ये १ हजार १८० जागा, तर खासगी महाविद्यालयांमध्ये १५ हजार ३५० जागा उपलब्ध होत्या. यापैकी शासकीय महाविद्यालयांमध्ये १ हजार १७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून केवळ ६ जागा रिक्त आहेत. मात्र, खासगी महाविद्यालयांमध्ये ५ हजार ५६७ जागा अद्याप रिक्त असून, तेथे ९ हजार ७८३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. एकूणच विद्यार्थ्यांनी शासकीय महाविद्यालयांना अधिक प्राधान्य दिल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

Comments are closed.