महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सचिवपदासाठी नेमकी उठाठेव सुरु आहे. आधीचे सचिव डॉ. सुवर्णा खरात यांची बदली झाल्यानंतर हे पद सध्या मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे तात्पुरत्या स्वरुपात दिलंय. पण प्रभार देतानाच शासनाच्या ठरावाचे उल्लंघन झाल्याची जोरदार चर्चा आहे.
म्हणजे काय तर, नियम धाब्यावर बसवून सचिवपदाचा प्रभार दिला गेलाय, असा आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लावला आहे. एवढंच नव्हे तर, कायमचा सचिव कोण व्हावा यासाठी मंत्रालयात काही अधिकार्यांची लॉबिंग सुरू असल्याचं देखील बोललं जातंय.
सामाजिक कार्यकर्ते आणि आम आदमी पक्षाचे विजय कुंभार यांनी सोशल मीडियावर यावर थेट टीका केलीय. त्यांनी म्हटलंय की, “सचिवपदासाठी लॉबिंगनं नाही, तर अनुभव असलेल्या आणि आयोगाचं कामकाज नीट जाणणाऱ्या व्यक्तीचीच नेमणूक झाली पाहिजे. लॉबिंग करून आलेल्या लोकांनी याआधीही संस्थेचं नुकसान केलंय.”
यावरूनच त्यांनी शासनाला विनंती केली की, “या पदावर योग्य सनदी अधिकारी किंवा संस्थेमधून एखादी लायक व्यक्तीच नेमावी, म्हणजे आयोगाची पत जपली जाईल.”
दुसरीकडे, एमपीएससी राज्यसेवा २०२५ परीक्षेच्या तारखांमध्येही अलीकडेच बदल झाला. पुरामुळे परीक्षा पुढे ढकलली गेली. पण आता सचिवपदाच्या नियोजनावरून नव्या वादाला तोंड फुटलेलं दिसतंय.
