मुलींच्या जन्माचे स्वागत आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेली ‘लेक लाडकी’ योजना पुणे जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली जात आहे. एका वर्षात सुमारे दहा हजार मुलींनी या योजनेचा लाभ घेतला असून, त्यापैकी आठ हजारांहून अधिक मुलींच्या खात्यात पहिल्या टप्प्यातील पाच हजार रुपयांची रक्कम जमा झाली आहे. ही योजना मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि समृद्धीच्या दृष्टीने अत्यंत मोलाची ठरत आहे.
राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने एप्रिल 2023 पासून ही योजना प्रभावी केली होती. सुरुवातीला लोकसभा व विधानसभा निवडणुकांमुळे योजनेच्या अंमलबजावणीत अडथळा आला होता, मात्र आता या योजनेला जिल्हाभरात चांगला वेग मिळू लागला आहे. नागरिकांमध्ये जागरूकता वाढली असून अंगणवाड्या, पर्यवेक्षक आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याद्वारे अर्ज प्रक्रिया अधिक गतिमान केली जात आहे.
‘लेक लाडकी’ योजनेच्या अंतर्गत मुलीच्या जन्मानंतर तिला टप्प्याटप्प्याने सुमारे एक लाख एक हजार रुपयांची रक्कम देण्यात येते. पहिला हप्ता पाच हजार रुपये जन्मानंतर लगेच मुलीच्या खात्यात जमा केला जातो. त्यानंतर मुलगी पाच वर्षांची झाल्यावर दुसऱ्या हप्त्याच्या स्वरूपात सहा हजार रुपये मिळतात. योजनेच्या पुढील टप्प्यातही मुलीच्या शिक्षणाशी संबंधित आधारावर आर्थिक लाभ मिळणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील एकूण नऊ हजार ७९६ अर्जांपैकी सहा हजार ५७३ लेकींच्या खात्यात पहिला हप्ता यशस्वीपणे जमा करण्यात आला आहे. उर्वरित १,६७६ अर्जांवर मंजुरी देण्यात आली असून, संबंधित मुलींच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होणार आहे. सुमारे १,५५० अर्ज अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. यावर काम वेगाने सुरू असून, एकही पात्र मुलगी या योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.
महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात एकत्रितपणे ६,००० पेक्षा जास्त अंगणवाड्या कार्यरत आहेत. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना खास सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक अंगणवाडीतून वेळेत आणि अचूक माहितीच्या आधारे अर्ज प्रक्रिया पार पाडली जात आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अलीकडेच या योजनेचा आढावा घेतला आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, कोणतीही पात्र मुलगी ‘लेक लाडकी’ योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही. तसेच प्रत्येक लाभार्थीला वेळेत हप्ता मिळावा यासाठी अंगणवाडी सेविकांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
संपूर्ण जिल्ह्यात योजनेच्या अंमलबजावणीत गती आल्याने नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे. महिला सबलीकरण, शिक्षण आणि बालकल्याणासाठी ही योजना एक महत्वाचा टप्पा ठरत असून, भविष्यात अधिकाधिक मुलींना तिचा लाभ मिळावा यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
‘लेक लाडकी’ योजना ही केवळ आर्थिक सहाय्याची योजना नसून, ती मुलींच्या भविष्यासाठी सकारात्मक पाऊल आहे – अशी भावना आता समाजात बळावत आहे.