पुढची पाच वर्षे ‘लाडकी बहीण योजना’ कायम — मुख्यमंत्री फडणवीसांचा महिलांना विश्वासाचा दिलासा! | Ladki Bahin Scheme to Continue 5 Years!

Ladki Bahin Scheme to Continue 5 Years!

अहेरी येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी एक महत्त्वाचा दिलासा दिला — “पुढची पाच वर्षे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही!” असा ठाम विश्वास व्यक्त करत त्यांनी सांगितले की, राज्यात आजवर २५ लाख लखपती दीदी तयार झाल्या असून हा आकडा १ कोटींपर्यंत वाढविण्याचा सरकारचा संकल्प आहे.

Ladki Bahin Scheme to Continue 5 Years!

शनिवारी अहेरी येथील १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, आणि जिल्हाधिकारी अविशांत पंडा उपस्थित होते.

या प्रसंगी जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत ‘आदिशा प्रकल्पा’ अंतर्गत महिला स्वयंसाहाय्यता बचत गटांना साडेतीन कोटी रुपये, तसेच प्रत्येक गटाला एक लाख रुपयांचे फिरते भांडवल फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

तत्पूर्वी सिरोंचा येथे ३५० खाटांच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, तसेच मेडिकल आणि नर्सिंग कॉलेजच्या भूमिपूजनाचे कार्यही पार पडले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “महत्मा फुले जनआरोग्य योजनेत आता २,४०० आजारांचा समावेश करण्यात आला आहे, ज्याचा थेट लाभ गोरगरीब नागरिकांना मिळणार आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, गडचिरोलीला “देशाचं स्टील हब” बनविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी जल, जंगल आणि जमीन या तिन्हींचं संवर्धन करत औद्योगिक विकासावर भर दिला जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी या भागातील उद्योगांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक स्थानिक युवकांना रोजगार मिळत असल्याचे समाधानही व्यक्त केले.

या कार्यक्रमातून मुख्यमंत्री फडणवीसांनी एकीकडे आरोग्य व औद्योगिक विकासाचा मार्ग दाखवला, तर दुसरीकडे महिलांच्या आर्थिक सबलीकरणाची हमी देत “लाडकी बहीण योजना” दीर्घकाळ सुरू राहणार असल्याचा विश्वास दिला.

Comments are closed.