‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक निर्णय झाला असून, नियमित हप्ता देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. मात्र डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचा आगाऊ एकत्रित हप्ता देण्यास आयोगाने नकार दिला आहे.
महायुती सरकारकडून मतदानाच्या आधी दोन महिन्यांची रक्कम एकाचवेळी खात्यात जमा करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आक्षेप घेतल्याने निवडणूक आयोगाने हस्तक्षेप केला. आयोगाच्या आदेशानुसार, आचारसंहिता काळात योजनेचा नियमित किंवा प्रलंबित हप्ता देता येईल, पण जानेवारी महिन्याचा लाभ आगाऊ स्वरूपात देता येणार नाही.
याआधी विधानसभा निवडणुकीपूर्वी तीन महिन्यांची रक्कम एकत्र देण्यात आली होती. त्यामुळे यावेळीही तसेच होणार, अशी चर्चा सुरू होती. मकर संक्रांतीपूर्वी ३,००० रुपये मिळणार असल्याच्या चर्चांनंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. मतदानाच्या अगोदर ४८ तासांत अशी रक्कम देणे म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला.
या प्रकरणी आयोगाने राज्याचे मुख्य सचिवांकडून स्पष्टीकरण मागवले होते. त्यानंतर दिलेल्या स्पष्ट आदेशात आयोगाने सांगितले की, योजना सुरू असलेली असल्याने नियमित लाभ देता येईल, मात्र नवीन लाभार्थी जोडता येणार नाहीत आणि आगाऊ हप्ता देण्यास मनाई राहील.

Comments are closed.