उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात शोककळा पसरली असून, या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षांच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल केला आहे. आज गुरुवार, २९ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या विधी (Law) आणि MBA अभ्यासक्रमांच्या दोन्ही सत्रातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्यावरील अंत्यसंस्कारामुळे बारामती तालुक्यातील बहुतांश शैक्षणिक संस्था बंद राहण्याची शक्यता आहे. तसेच राज्यभरातून बारामतीकडे जाणाऱ्या मोठ्या जनसमुदायाचा विचार करता, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे विद्यापीठांतर्गत सध्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू असून, त्यातील विधी आणि MBA अभ्यासक्रमांचे पेपर आज २९ जानेवारी रोजी नियोजित होते. मात्र सद्यस्थिती लक्षात घेता हे पेपर रद्द करण्यात आले असून, संबंधित परीक्षा आता येत्या ३ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहेत, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांनी नव्या तारखेनुसार तयारी करावी आणि अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहनही विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

Comments are closed.