विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून, अद्याप नोंदणी न केलेल्या पात्र मतदारांसाठी ही शेवटची संधी असल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
पदवीधर व शिक्षक मतदारांनी पदनिर्देशित अधिकारी, सर्व प्रांत व तहसील कार्यालयांमध्ये तसेच मुख्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मतदार यादीवरील आक्षेपांसाठी फॉर्म-७, तर तपशील दुरुस्तीसाठी फॉर्म-८ सादर करावा लागणार आहे. आतापर्यंत पदवीधर मतदारसंघासाठी २० हरकती प्राप्त झाल्या असून, शिक्षक मतदारसंघासाठी कोणतीही हरकत नोंदवण्यात आलेली नाही. प्राप्त सर्व हरकतींचा निपटारा करण्यात आला आहे.
१ नोव्हेंबर २०२५ हा अर्हता दिनांक मानून नोंदणी प्रक्रिया राबवण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात पदवीधरांसाठी १२३ केंद्रांवर ४१,३९८ मतदार, तर शिक्षकांसाठी ४४ केंद्रांवर ९,००२ मतदारांची नोंदणी झाली आहे. अंतिम मतदार यादी satara.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नोंदणीसाठी अर्जदार भारतीय नागरिक व सातारा जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. पदवीधर मतदारांसाठी १ नोव्हेंबर २०२२ पूर्वीची पदवी, तर शिक्षक मतदारांसाठी किमान तीन वर्षांचा मान्यताप्राप्त शाळेतील पूर्णवेळ अध्यापनाचा अनुभव आवश्यक आहे. पात्र मतदारांना mahaelection.gov.in या संकेतस्थळावरूनही नाव नोंदणी करता येणार आहे.

Comments are closed.