मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे का, याची तपासणी लवकरच सुरू होणार आहे. महिला व बालकल्याण विभागाने आरटीओकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंगणवाडी सेविकांना सव्वातीन हजार लाभार्थींची यादी देण्यात आली आहे.
चारचाकी वाहन असल्यास लाभ बंद
योजनेसाठी अर्ज करताना महिलांकडून हमीपत्र घेतले होते की, त्यांच्या कुटुंबात चारचाकी वाहन नाही. मात्र, काही लाभार्थींच्या नावावर कार असल्याचे उघड झाले आहे. आता अशा महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे.
स्वतःच्या नावावर कार नसल्यास मिळणार लाभ
कुटुंबातील इतर नातेवाइकांच्या नावावर कार असूनही, लाभार्थी महिला आपल्या पती व मुलांसोबत स्वतंत्र राहत असल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळत राहील. मात्र, त्यासाठी खातरजमा करण्यात येणार आहे.
तपासणीसाठी जिल्ह्यात मोठी मोहिम
जिल्ह्यातील ३२५० लाभार्थींची तपासणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लाभार्थींच्या कुटुंबाची माहिती घेणार असून, शासनाने दिलेल्या यादीतील नाव आणि प्रत्यक्ष माहिती याची पडताळणी केली जाणार आहे.
निकष न पाळणाऱ्यांना योजना बंद
शासनाने योजनेसाठी ५ एकर शेती, शासकीय नोकरी आणि वार्षिक उत्पन्नाची अडीच लाख रुपयांची अट घातली आहे. हे निकष न पाळणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेतून वगळले जाणार आहे.