राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असलेल्या कुटुंबांतील महिलांना दरमहा १५०० रुपये थेट बँक खात्यात देणारी ही योजना अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय ठरली. विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेमुळे महिलांमध्ये मोठा विश्वास निर्माण झाला आणि त्याचा फायदा महायुतीला निवडणुकीत स्पष्टपणे मिळाला. राज्यात महायुतीचे सरकार भक्कम बहुमताने सत्तेत आले.

निवडणूक प्रचारादरम्यान सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींच्या सन्मान निधीत वाढ करून १५०० ऐवजी २१०० रुपये देण्यात येतील, असे आश्वासन महायुतीतील नेत्यांकडून देण्यात आले होते. मात्र सरकार स्थापन होऊन जवळपास एक वर्षाचा कालावधी उलटूनही ही वाढ कधी होणार, याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले होते. अखेर या प्रश्नावर आता मोठी अपडेट समोर आली आहे.
साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. “अडीच वर्षांत मी शांत झोप घेतली नसेल, एवढं काम केलं आहे. लाडक्या बहिणींनी ठरवून लाडक्या भावाला निवडून आणलं. या योजनेसाठी वर्षाला तब्बल ४५ हजार कोटी रुपयांचा खर्च येत असतानाही आम्ही धाडस केलं. ज्यांनी या योजनेत अडथळे आणले, त्यांना लाडक्या बहिणींनी २३२ जागांचा जोरदार उत्तर दिलं,” असे त्यांनी सांगितले.
शिंदे पुढे म्हणाले की, “लाडक्या बहिणींना दिलेले १५०० रुपयांचे अनेक यशस्वी अनुभव आमच्यासमोर आहेत. १५०० रुपयांचे २१०० रुपये करण्याचा शब्द आम्ही दिला आहे आणि तो योग्य वेळी नक्कीच पाळणार. मी जे बोलतो ते करून दाखवतो,” अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या घोषणेमुळे राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला असून, आता २१०० रुपयांच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा अधिकच वाढली आहे.

Comments are closed.