मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेतील सव्वादोन कोटी लाभार्थींपैकी २६ लाख ३४ हजार महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी झाली आहे. त्यात २१ वर्षांपेक्षा कमी व ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला, तसेच एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी महिलांचा समावेश होता. पडताळणीचा अहवाल शासनाला सादर केला गेला आहे.
योजनेत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिला पात्र होत्या आणि एका कुटुंबातून फक्त दोन महिलांनाच (एक विवाहित, एक अविवाहित) लाभ मिळण्याचा नियम होता. तरीही अनेक महिला नियम न पाहता अर्ज करून लाभ मिळवून गेल्या. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या डेटावरून अशा अर्जदारांची पडताळणी केली गेली.
सोलापूरमध्ये साडेदहा हजार आणि राज्यभरात चार लाखांहून अधिक महिलांना त्यांच्या दिलेल्या पत्त्यावर शोधता आले नाही. मात्र, एकाच कुटुंबातील काही महिलांचे विवाह झाल्यामुळे रेशनकार्ड विभक्त आहेत, त्यामुळे त्यांचा लाभ बंद केला जाणार नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पडताळणी अहवाल शासनाला सादर झाला असून, शासनस्तरावरून पुढील निर्णय होणार आहे. काही तक्रारींमध्ये आधार क्रमांक चुकीचा दिल्यामुळे लाभ दुसऱ्या खात्यात जमा झाल्याचे आढळले आहे. आता त्या रकमेसाठी योग्य पद्धत निश्चित करणे अधिकाऱ्यांसमोर आहे.
पडताळणीची मुख्य स्थिती:
अपेक्षित पडताळणी: २६.३४ लाख महिला
कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी: १९.३७ लाख महिला
पत्त्यावर न सापडलेल्या महिला: ४.२३ लाख महिला

Comments are closed.