लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची प्रत्यक्ष (फिजिकल) पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर देण्यात येणार होती. मात्र, या कामासाठी अंगणवाडी सेविकांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला असून याबाबत त्यांच्या संघटनेने अधिकृत भूमिका मांडली आहे.
लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी करूनही अनेक महिलांच्या खात्यात ₹१५०० जमा झाले नाहीत. केवायसीदरम्यान काही प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्याने अडथळा निर्माण झाल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने प्रत्यक्ष पडताळणीचे आदेश दिले. त्यानुसार सेविकांना घरोघरी जाऊन अर्जांची तपासणी करावी लागणार होती.
मात्र अंगणवाडी सेविकांचे म्हणणे आहे की, त्यांचे आधीचे मानधन व अर्ज भरण्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. एका अर्जामागे ५० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, पण ते अद्याप पूर्ण झालेले नाही. आधीच प्रलंबित मानधनामुळे नव्या जबाबदाऱ्या स्वीकारणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सेविकांच्या संघटनेने महिला व बालविकास अधिकाऱ्यांना पत्र देत सांगितले आहे की, केवायसीवेळी महिलांचे व्हेरिफिकेशन आधीच झाले आहे. पुन्हा प्रत्यक्ष पडताळणी केल्यास लाभार्थी महिलांमध्ये नाराजी वाढू शकते. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील फिजिकल व्हेरिफिकेशनचे काम आम्हाला देऊ नये, अशी ठाम भूमिका अंगणवाडी सेविकांनी घेतली आहे.

Comments are closed.