लाडक्या बहिणींचा उद्योगाकडे प्रवास!-Ladki Bahin Steps into Entrepreneurship!

Ladki Bahin Steps into Entrepreneurship!

लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या मासिक मदतीपुरतेच समाधान न मानता महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभा करावा, हा राज्य शासनाचा स्पष्ट हेतू आहे. त्याच दिशेने पुढे टाकलेले पाऊल म्हणून सोनगीर येथे महिलांसाठी विशेष पतसंस्थेची सुरुवात करण्यात आली आहे.

Ladki Bahin Steps into Entrepreneurship!या उपक्रमातून महिला उद्योजक आणि व्यापारी क्षेत्रात ठसा उमटवतील, असा विश्वास आमदार राम भदाणे यांनी व्यक्त केला.

रविवारी (ता. २५) सायंकाळी सोनगीर येथे लाडकी बहीण योजनेंतर्गत सुरू झालेल्या राज्यातील पहिल्या, सुमारे हजार सभासद असलेल्या महिला पतसंस्थेचे उद्घाटन आमदार राम भदाणे आणि माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष, स्थानिक पदाधिकारी, सरपंच, माजी लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की, महिलांच्या हाती आर्थिक निर्णयक्षमता आली की त्या काटकसरीने बचत करतात व नियोजनबद्ध गुंतवणूक करतात. त्यामुळे ही पतसंस्था भविष्यात निश्चितच यशस्वी ठरेल.

या संस्थेला ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला पतसंस्था’ असे नाव देण्यात आले असून, संपूर्ण कारभार १०० टक्के संगणकीकृत ठेवण्यात आला आहे. महिला बचत गटांना प्रोत्साहन, महिला उद्योजकांसाठी विशेष कर्ज योजना, मासिक व मुदत ठेव, कमी व्याजदरात कर्ज, आपत्कालीन आर्थिक मदत, आर्थिक साक्षरता व शासकीय योजनांची माहिती देणारे मार्गदर्शन केंद्र अशा विविध सुविधा येथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

संस्थेच्या अध्यक्षा रूपाली माळी असून, उपाध्यक्षा चित्रा कासार, सचिव प्रतिभा पावनकर यांच्यासह महिला संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग पतसंस्थेचा कारभार सांभाळणार आहे.

Comments are closed.