लाडकी बहीण योजनेवर राज्यभरात चर्चा सुरू असतानाच एक महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. योजनेतील लाभार्थ्यांचे ई-केवायसी आणि क्रॉस व्हेरिफिकेशन वेगात सुरू असून या तपासणीत अनेक अनियमितता उघडकीस येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात तब्बल ३० हजारांहून अधिक महिलांचे अर्ज रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे ६ लाख ४० हजार महिलांची सखोल तपासणी करण्यात आली. या प्रक्रियेत पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसल्यामुळे एकूण ३०,३०४ महिलांचा योजनेतील लाभ बंद करण्यात आला आहे. याशिवाय, स्वतःहून लाभ नको असल्याची विनंती करणाऱ्या ३९० महिलांचे अर्जही रद्द करण्यात आले आहेत.
महिला व बालकल्याण विभागाने पात्र लाभार्थी महिलांना तातडीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. वेळेत ई-केवायसी न केल्यास पुढील काळात लाभ बंद होण्याची शक्यता असल्याचा इशाराही विभागाकडून देण्यात आला आहे.
फक्त बुलढाणाच नव्हे तर राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांतूनही मोठ्या प्रमाणावर अर्ज रद्द झाल्याचे अहवाल समोर येत आहेत. पात्रतेची काटेकोर तपासणी सुरू असून केवळ नियमांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच पुढे योजनेचा लाभ मिळणार आहे. लाखो अर्जांची छाननी सध्या अंतिम टप्प्यात आहे.
या संपूर्ण प्रक्रियेबाबत विधानसभेत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली. योजनेच्या सुरुवातीला २ कोटी ६३ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी २ कोटी ४३ लाखांपेक्षा जास्त अर्ज मंजूर करण्यात आले. मात्र तपासणीत अनेक अपात्र अर्ज बाद झाले असून काही शासकीय कर्मचारी महिलांनीही चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.