‘लाडकी बहीण’ला राजकारणात ओढू नका! विरोध केलात तर घरी बसाल – मुख्यमंत्र्यांचा स्वपक्षीयांना कडक इशारा! | CM Warns Party MLAs Over Ladki Bahin!

CM Warns Party MLAs Over Ladki Bahin!

‘नको त्या विषयात माझी लाडकी बहीण योजना ओढली, तर घरी बसावे लागेल,’ असा ठाम आणि कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांनाच दिल्याने विधानसभेत काही काळ सत्तापक्षात शांतता पसरली.

CM Warns Party MLAs Over Ladki Bahin!

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील शासकीय रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा मुद्दा आमदार अमित साटम यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. मात्र चर्चेदरम्यान काही आमदारांनी या संवेदनशील विषयाशी ‘लाडकी बहीण’ योजनेचा संदर्भ जोडण्यास सुरुवात केल्याने मुख्यमंत्री नाराज झाले.

काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांनीही वेगळ्या मुद्द्यावर बोलताना या योजनेचा उल्लेख केल्याने मुख्यमंत्र्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ‘लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची असून, तिला राजकीय फायद्यासाठी प्रत्येक विषयात ओढू नका.

सातारा येथील महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी दोषी असणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही. सर्व विषय या योजनेशी जोडणे चुकीचे आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. अडीच कोटींहून अधिक महिलांनी ही योजना स्वीकारली असून, यासाठी इतर कोणत्याही योजनेचा निधी वळवला जाणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

यानंतर भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी कथित अवैध दारू वितरणाचा मुद्दा मांडताना पुन्हा ‘लाडकी बहीण’ योजनेचा संदर्भ दिला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ हस्तक्षेप करत, ‘लाडक्या बहिणीला विरोध कराल, तर घरी बसाल,’ असा थेट इशारा दिला. मुख्यमंत्र्यांच्या या कडक भूमिकेनंतर उर्वरित प्रश्नकाळात कोणत्याही सदस्याने या योजनेचा उल्लेख करण्याचे टाळले.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. ही योजना पुढेही अखंडपणे सुरू राहील आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवण्यात येतील, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

Comments are closed.