राज्यातील महिलांची हलाखीची परिस्थिती ओळखून आपण मुख्यमंत्री असतानाच ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली होती. काही लोकांनी या योजनेत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला; मात्र मतदारांनी त्यांना योग्य तो धडा शिकवला आहे. ही योजना कधीही बंद होणार नाही, अशी ठाम ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी अमरावती आणि अकोला येथील जाहीर सभांमध्ये दिली.

अमरावती महापालिकेतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी नेहरू मैदान येथे आयोजित सभेत शिंदे बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मंत्री संजय राठोड, माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार अभिजीत अडसूळ, जगदीश गुप्ता, प्रीती बंड आदी मान्यवर उपस्थित होते. शिंदे म्हणाले की, अमरावती महापालिकेत यापूर्वी सर्वच पक्ष सत्तेत होते; तरीही पिण्याचे शुद्ध पाणी, वीज, आरोग्य आणि रोजगार यांसारखे मूलभूत प्रश्न कायम राहिले. शिवसेनेला संधी दिल्यास आम्ही दिलेला शब्द नक्की पाळू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“मी जे बोलतो ते करतोच; पण जे बोलत नाही तेही करून दाखवतो,” असे सांगत शिंदेंनी विकासावर भर दिला. सत्तेसाठी काही जण एकत्र आले असले तरी लोकांना खरी परिस्थिती माहीत असल्याचे सूचक भाष्यही त्यांनी केले.
अकोल्यात जुने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर झालेल्या सभेत शिंदे म्हणाले, शिवसेनेचा धनुष्यबाण आज चांदा ते बांदा पोहोचला आहे. राज्यात ७० नगराध्यक्ष आणि १४०० नगरसेवक निवडून आले असून, बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी शाबासकी दिली असती. “शब्द देण्यापूर्वी दहा वेळा विचार करा; दिला की तो पाळावा लागतो,” हा बाळासाहेबांचा संदेश आठववत शिंदेंनी आपण त्यांचेच चेल्य असल्याचे ठामपणे सांगितले.
सभेदरम्यान महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेत आलेले आणि तिकीट वाटपावरून नाराज झालेले जगदीश गुप्ता व्यासपीठावर शिंदेंच्या शेजारी दिसले. सुरुवातीलाच त्यांच्या भाषणाला प्राधान्य देण्याचा सल्ला शिंदेंनी दिल्याने नाराजी दूर झाल्याची चर्चा रंगली. एकूणच, महिलांसाठीची ‘लाडकी बहीण’ योजना आणि विकासाचा शब्द पाळण्याचा निर्धार शिंदेंनी पुन्हा एकदा ठामपणे अधोरेखित केला.

Comments are closed.