बुलढाणा जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत अपात्र लाभार्थ्यांचा गैरप्रकार उघडकीस आल्याने शासनाने कठोर कारवाई सुरू केली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागातील ८ महिला कर्मचाऱ्यांनी सरकारी सेवेत असूनही योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या आठही महिलांकडून घेतलेल्या लाभाची रक्कम वसूल करण्यात आली असून, आता त्यांच्या खातेनिहाय सखोल चौकशी केली जाणार आहे.

जिल्ह्यात एकूण ६ लाख ७१ हजार १८३ महिलांनी ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज केले होते. मात्र अर्जांची छाननी करताना अनेक बोगस आणि अपात्र लाभार्थी समोर आले. यानंतर शासनाने पात्र-अपात्र पडताळणीसाठी विशेष मोहीम हाती घेतली. या प्रक्रियेत स्वतःहून लाभ सोडलेल्या महिला तसेच इतर अपात्र ठरलेल्या अशा ४६ हजार ५६४ महिलांचा लाभ रद्द करण्यात आला आहे. या महिलांना मिळणारा दरमहा १५०० रुपयांचा लाभ पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
तपासादरम्यान असेही आढळून आले की, शासकीय सेवेत असलेल्या आणि चांगला पगार घेणाऱ्या काही महिलांनीही योजनेचा चुकीचा लाभ घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य विभागातील ८ महिला कर्मचाऱ्यांची नावे पुढे आली. शासनाने तत्काळ कारवाई करत त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम परत वसूल केली असून, आता संबंधित व्यवहार, बँक खाती आणि अर्ज प्रक्रियेची सविस्तर चौकशी केली जाणार आहे.
या कारवाईमुळे ‘लाडकी बहीण’ योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि काटेकोर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच अपात्र लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली असून, शासन यापुढेही बोगस लाभार्थ्यांवर कठोर पावले उचलणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Comments are closed.