पुणे जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा धक्का बसला असून, या योजनेचा लाभ घेणारे तब्बल १,२०१ पुरुष लाभार्थी आढळून आले आहेत. विशेष म्हणजे हवेली आणि पुणे तालुक्यात सर्वाधिक ४८७ पुरुष लाभार्थी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

‘ई-केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करूनही सव्वादोन लाख महिलांना अनुदान मिळत नसल्याने आता या सर्व लाभार्थ्यांची थेट प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या दीड हजार रुपयांच्या अनुदानापासून अनेक गरजू महिला वंचित राहिल्या असून, काही अपात्र व्यक्तींना मात्र लाभ मिळाल्याचे चित्र दिसत आहे.
ई-केवायसी दरम्यान अनेक तांत्रिक अडचणी आल्याने अर्ज करूनही अनेक महिलांचे अनुदान सुरू झाले नाही. विशेष म्हणजे ज्यांच्या कुटुंबात चारचाकी वाहन, सरकारी नोकरी किंवा पेन्शन नाही, अशा महिलांचे अनुदान बंद झाले, तर काही अपात्र लाभार्थ्यांना पैसे मिळत राहिले. याबाबत तक्रारी वाढल्यानंतर महिला व बाल विकास विभागाने गंभीर दखल घेतली असून, पुणे जिल्ह्यातील सुमारे २० लाख लाभार्थ्यांची नव्याने तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
आता जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी चौकशी करण्यात येणार असून, लाभार्थी महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार किंवा पेन्शनधारक कोणी आहे का, याची खातरजमा केली जाणार आहे.
घरात सरकारी नोकरी किंवा पेन्शनधारक आढळल्यास ती महिला अपात्र ठरणार आहे; अन्यथा पात्र महिलांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या प्रक्रियेत पुणे जिल्ह्यातील सुमारे २ लाख २५ हजार ३६० महिलांची सखोल पडताळणी होणार असून, बनावट लाभार्थ्यांवर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments are closed.