लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीची ‘भेट’ की आचारसंहितेचा भंग? राजकीय वाद पेटला! | Ladki Bahin Scheme Sparks Political Controversy!

Ladki Bahin Scheme Sparks Political Controversy!

मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर ‘लाडक्या बहिणींना मोठी भेट’ या आशयाचे पोस्टर समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून, १४ जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होणार असा दावा करण्यात येत आहे. या दाव्यांमुळे पुणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांकडून हा आचारसंहितेचा थेट भंग असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Ladki Bahin Scheme Sparks Political Controversy!

पुणे महापालिका निवडणुकीत स्वबळावर उतरलेल्या महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेला प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. मात्र, आता लाभार्थींना कधी आणि किती रक्कम मिळणार याबाबतची पोस्टर्स व दावे समाजमाध्यमांवर झळकू लागल्याने वाद अधिकच चिघळला आहे. निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान असून, त्याआधीच निधी जमा होणार असल्याचे दावे केल्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

महायुतीतीलच काही उमेदवार त्यांच्या समाजमाध्यम खात्यांवरून मकरसंक्रांतीच्या आधीच तीन हजार रुपये खात्यात जमा होतील असा प्रचार करत असल्याने, सत्ताधारीच एकमेकांवर कुरघोडी करत असल्याचे चित्र दिसत आहे. सरकारकडून जर प्रत्यक्षात मकरसंक्रांतीच्या दिवशी निधी वितरित झाला, तर या निर्णयाची राजकीय ‘संक्रात’ नेमकी कोणावर येणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. पुणे महापालिकेत किमान ११७ जागांवर महायुतीतील घटकपक्ष एकमेकांसमोर असल्याने, सरकारी योजनेच्या लाभावरूनच राजकीय संघर्ष तीव्र होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Comments are closed.