राज्य सरकारने विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात असल्याने सुरुवातीला योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आणि अनेक अर्ज मंजूरही झाले.
मात्र, पुढील टप्प्यात महिला व बालकल्याण विभागाकडून अर्जांची सखोल छाननी सुरू झाली. यावेळी ई-केवायसीची अट बंधनकारक करण्यात आली. नियम व अटी पूर्ण न करणाऱ्या अनेक अर्जांमुळे काही महिलांचे हप्ते थांबवण्यात आल्याचे समोर आले.
ई-केवायसी करूनही पैसे खात्यात जमा न झाल्याने अनेक महिला संतप्त झाल्या. जळगावमध्ये महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात महिलांनी मोठा गोंधळ घातल्याचे चित्र पाहायला मिळाले. वाढता तणाव पाहून कर्मचाऱ्यांनी महिलांना कार्यालयाबाहेर काढत प्रवेशद्वारालाच कुलूप लावल्याचा आरोप आहे.
या प्रकारानंतर महिलांनी स्वतःचे व्हिडिओ तयार करून आपली व्यथा मांडली असून हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ई-केवायसी करूनही योजनेचे पैसे मिळत नसल्याची तक्रार महिलांकडून सातत्याने केली जात आहे.

Comments are closed.