लाडक्या बहिणी ठरवतील पुण्याचा कारभारी!-Ladki Bahin Power to Change Pune!

Ladki Bahin Power to Change Pune!

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना मी भाऊ म्हणून सुरू केली असून, ती कुणीही बंद करू शकत नाही. ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींनी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ठाम कौल दिला, त्याच ताकदीने त्या पुणे महापालिकेतील सत्ताकेंद्रही बदलतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Ladki Bahin Power to Change Pune!पुणे महापालिकेवर शिवसेना विकासाचा भगवा फडकावून निर्णायक भूमिका बजावेल, असे त्यांनी स्पष्ट करत सांगितले की, लाडक्या बहिणींच्या पाठबळावर शहराच्या विकासासाठी ठोस आणि प्रभावी नेतृत्व उभे राहील.

कात्रज येथील जाहीर सभेत बोलताना शिंदे यांनी विरोधकांना इशाराच दिला. ‘लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिकांमध्ये विजयाची हॅट्ट्रिक करणाऱ्या शिवसेनेला कमी लेखणाऱ्यांना कात्रजचा घाट दाखवू. पुण्यात उणे नसून अधिकची बेरीज करणारे राजकारण करू,’ असे त्यांनी सांगितले.

पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आश्वासने देत शिंदे म्हणाले, ‘५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मिळकतकर माफ केला जाईल. कात्रजचा एकात्मिक विकास आराखडा, कोंडीमुक्त रस्ते, मजबूत पाणीपुरवठा, सांडपाणी वाहिन्यांचे जाळे, अपघातमुक्त नवले पूल आणि प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण यासाठी निधी उपलब्ध करून देऊ. पुणे महापालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षात शहराला विकासाचे अमृत पाजू.’

‘उमेदवारांच्या पाठीशी महिला आणि मतपेटीत क्रमांक पहिला,’ अशी घोषणा देत त्यांनी लाडक्या बहिणींना परिवर्तनाची साद घातली. सर्वसामान्य घरातून मुख्यमंत्री झाल्याने काहींची अस्वस्थता वाढली असून, त्यावर योग्य उपचार करण्याची वेळ आली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

शहरातील दगडफेक आणि दहशतीवर नाराजी व्यक्त करत शिंदे म्हणाले, ‘पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. येथे दादागिरी चालणार नाही. शहर भ्रष्टाचारमुक्त, गुन्हेगारीमुक्त आणि झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. जुन्या वाड्यांचा पुनर्विकास केला जाईल आणि नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले जातील.’

या सभेला शिवसेनेचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.