राज्य शासनाच्या सर्व अटींची पूर्तता करून केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असतानाही गेल्या दोन महिन्यांपासून ‘लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता बँक खात्यात जमा न झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो महिलांमध्ये तीव्र संतापाची भावना उसळली आहे. अखेर या नाराजीचा उद्रेक होत संतप्त महिलांनी थेट जिल्हा महिला व बालविकास कार्यालयावर जोरदार धडक देत आपल्या मागण्यांचा ठाम आवाज उठवला.

यवतमाळ जिल्ह्यात सहा लाखांहून अधिक लाडक्या बहिणी असून, यापूर्वी त्यांच्या खात्यात दरमहा १,५०० रुपये नियमितपणे जमा होत होते. मात्र शासनाने योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी केवायसी अनिवार्य केली होती. त्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. अनेक महिलांनी वेळेत सर्व कागदपत्रांची पूर्तता करून केवायसी पूर्ण केली असतानाही नोव्हेंबरपासून अचानक हप्ते थांबल्याने महिलांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, राज्यात आधी नगर परिषद व त्यानंतर महानगरपालिका निवडणुकांची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे हप्त्यांचे वितरण रखडले. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने “नियमित व प्रलंबित लाभ देता येतील, मात्र जानेवारीचा हप्ता अग्रीम स्वरूपात देता येणार नाही” असे स्पष्ट निर्देश दिले होते. तरीही, यापूर्वी सातत्याने आर्थिक मदत मिळणाऱ्या महिलांना अचानक पैसे मिळेनासे झाल्याने नाराजीचा सूर अधिक तीव्र झाला आहे.
या आंदोलनादरम्यान जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विशाल जाधव यांनी काही महिलांची नावे नियमांमध्ये न बसल्यामुळे किंवा केवायसी अपूर्ण राहिल्याने योजनेतून वगळण्यात आल्याचे सांगितले. तसेच, पुन्हा केवायसीची मुदत वाढवावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, “केवायसी करूनही जर लाभ मिळत नसेल, तर आम्हाला न्याय मिळायलाच हवा” अशी ठाम भूमिका महिलांनी घेतली असून, थकीत हप्ते तात्काळ जमा करण्याची मागणी अधिक जोर धरू लागली आहे. लाडक्या बहिणींच्या या आंदोलनामुळे प्रशासनावर आता तातडीने निर्णय घेण्याचा दबाव वाढला आहे.

Comments are closed.