खामगाव तालुक्यातील सात ते आठ गावांमध्ये ग्रामपंचायतीमार्फत दिल्या जाणाऱ्या दवंडीमुळे महिलांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. “बचतगटात सामील व्हा, अन्यथा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद केला जाईल; शिवाय इतर शासकीय योजनांचाही लाभ मिळणार नाही” असा इशारा देणारी दवंडी दिल्याने प्रशासनातही खळबळ उडाली आहे.

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कुटुंब समावेशनासाठी अधिकाधिक महिलांना बचतगटांमध्ये सहभागी करून घेण्याचा उद्देश असला, तरी काही ग्रामपंचायतींनी याचा अर्थ सक्तीचा काढत थेट योजनांचे लाभ बंद करण्याची भाषा वापरल्याचे निदर्शनास आले आहे.
फत्तेपूर, लाखनवाडा, पळशी खुर्द, संभापूर, पळशी शहापूर आदी गावांमध्ये “बचतगटात नाव नसल्यास लाडकी बहीण योजना, लखपती दीदी योजना तसेच रेशन योजनांचा लाभ थांबवला जाईल, रेशनकार्डमधून नाव वगळले जाईल” असा मजकूर दवंडीमध्ये सांगितल्याची माहिती आहे.
बचतगट वाढीसाठी कार्य करणाऱ्या ग्राम सखींनी ग्रामसेवकांच्या मदतीने ही दवंडी दिल्याची चर्चा असून, हे प्रशासकीय टार्गेट पूर्ण करण्यासाठी तर नाही ना, असा सवालही ग्रामीण भागात उपस्थित केला जात आहे. दरम्यान, प्रशासनाने या प्रकाराची दखल घेत “अशी दवंडी देणे चुकीचे असून ही चूक तत्काळ सुधारावी” असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
अभियानात सहभाग घेतल्यास महिलांना अधिकाधिक शासकीय योजनांचा लाभ मिळावा हा खरा उद्देश असून, सहभाग न घेतल्यास योजना बंद होतील, अशी भीती पसरवणे नियमबाह्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आधीच अनेक महिलांना दोन-तीन महिन्यांपासून ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळालेला नाही, काहींची नावे यादीतून वगळली गेली आहेत.
लाभ का थांबला यासाठी महिलांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असताना, आता बचतगटात नाव नसल्यामुळे लाभ बंद होईल, या दवंडीमुळे महिलांमध्ये अधिकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून स्पष्ट माहिती दिल्याने महिलांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.