मार्चअखेर उलटूनही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही हप्ते एकत्रित स्वरूपात १५ एप्रिलपर्यंत जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते, पण मागील काही महिन्यांपासून हप्ते उशिरा मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यापूर्वी जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये मिळाला होता, आणि आता फेब्रुवारी-मार्च हप्तेही रखडल्याने महिलांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
दरम्यान, जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार, ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांनाच या दोन्ही महिन्यांचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे सर्व लाभार्थींनी आपली ई-केवायसी वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. ई-केवायसीसाठी यापूर्वी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांची प्रक्रिया अपूर्ण राहिली.
त्यामुळे आता सरकारने मार्चअखेरपर्यंत अंतिम मुदत वाढवली आहे. या कालावधीतही प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभ कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता असल्याने महिलांनी तत्काळ आवश्यक ती कारवाई करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments are closed.