‘लाडकी बहीण’ योजनेचे हप्ते निवडणुकीनंतर द्या : काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी! | Give Ladki Bahin Instalments After Polls!

विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर २०२५ व जानेवारी २०२६ या कालावधीतील प्रलंबित हप्ते महानगरपालिका निवडणुकीनंतरच देण्यात यावेत, अशी ठाम मागणी काँग्रेसने केली आहे.

Give Ladki Bahin Instalments After Polls!

हे दोन्ही हप्ते निवडणुकीच्या अगदी आदल्या दिवशी देण्याचा घाट राज्य सरकारकडून घातला जात असल्याचा आरोप करत, यामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव पडू शकतो, अशी गंभीर चिंता काँग्रेसने व्यक्त केली आहे.

या संदर्भात महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर यांनी निवडणूक आयोगाकडे लेखी निवेदन सादर करून तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली आहे. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली असून, या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेतील लाभार्थ्यांना नोव्हेंबर २०२५चा हप्ता देण्यात आला असून, मात्र डिसेंबर २०२५ व जानेवारी २०२६चे हप्ते अद्याप प्रलंबित आहेत.

हे दोन्ही हप्ते महानगरपालिका निवडणुकीच्या आदल्या दिवशी एकत्रितपणे देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळेच हे हप्ते निवडणुकीनंतरच देण्यात यावेत, अशी स्पष्ट मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

“लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही; मात्र प्रलंबित हप्ते निवडणुकीपूर्वी दिल्यास महिलांवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि मतदानाच्या दिवशी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना फायदा होण्याची शक्यता आहे. म्हणूनच आम्ही निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे,” असे कोंडविलकर यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.