राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या हप्त्याच्या वितरणाची तांत्रिक प्रक्रिया शुक्रवारी सुरू करण्यात आली असून, पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व पात्र महिलांच्या आधार-संलग्न बँक खात्यांमध्ये रक्कम जमा होईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

मंत्री तटकरे यांनी समाजमाध्यमांद्वारे ही माहिती देताना स्पष्ट केले की, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र दिला जाणार असल्याच्या चर्चा केवळ अफवा असून, सध्या फेब्रुवारी महिन्याचाच हप्ता वितरित केला जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
राज्य सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी सातत्याने आणि प्रभावीपणे सुरू ठेवली जात आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित विभागांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना अधिक मजबूत होत असून, लाभार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्याचा सरकारचा निर्धार असल्याचेही मंत्री तटकरे यांनी सांगितले.
‘लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक आधार मिळत असून, त्यांच्या सक्षमीकरणासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आगामी काळातही ही योजना अशाच प्रकारे सुरू राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Comments are closed.