मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या या निर्णयानुसार लाभार्थ्यांना आता ३० एप्रिलपर्यंत दुरुस्ती करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. मात्र, यानंतर कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत पूर्वी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत होती. परंतु, अनेक लाभार्थ्यांनी केवायसी करताना काही महत्त्वाच्या माहितीमध्ये चुका केल्या होत्या. विशेषतः कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी आहे का, स्थानिक स्वराज्य संस्थेत कार्यरत आहे का किंवा निवृत्त होऊन पेन्शन घेत आहे का, यासंबंधी पर्याय निवडताना अनेकांनी चुकीची माहिती भरली होती.
राज्यभरातून या त्रुटी दुरुस्त करण्याची मागणी होत होती. त्यानुसार सरकारने ही मुदतवाढ देत लाभार्थ्यांना अंतिम संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी ३० एप्रिलपूर्वी आपली ई-केवायसी माहिती तपासून आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.