राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय. सरकारने दिलेली दोन महिन्यांची मुदत उद्या म्हणजे १८ नोव्हेंबरला संपतेय, पण अजूनही साधारण एक कोटीहून अधिक महिलांची ई-केवायसी बाकी आहे.
सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्याने महिलांची नाराजी सरकारला परवडणारी नाही. त्यामुळे निवडणुका आटोपेपर्यंत मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता असल्याची माहिती समोर येतेय.
या योजनेत सुरुवातीला तब्बल २.५९ कोटी महिलांनी अर्ज केला होता. मात्र पडताळणीत चारचाकी वाहनधारक, दोनपेक्षा जास्त महिलांचा समावेश असलेली कुटुंबे, शासकीय सेवक, चुकीचे वय, पुरुष लाभार्थी आणि इतर योजना घेणारे असे विविध निकष लागू झाल्यानं साधारण ५० लाखांहून अधिक लाभार्थी कमी झाले. आता ई-केवायसीनंतर वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असणाऱ्यांचा लाभही बंद होणार असल्याने अनेकांनी ई-केवायसी पुढे ढकलली आहे.
अनेक महिलांचे आधारशी लिंक असलेले मोबाईल नंबरच बंद असल्यामुळे त्यांना आधी आधार अपडेट करावा लागणार आहे. तर काहींच्या नावे पत्ता किंवा वडिलांचे नाव योग्य नसल्याने त्यांचीही प्रक्रिया अडकली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिलांना ई-केवायसी करण्यासाठी अजून वेळ लागणार हे स्पष्ट होतंय.
दरम्यान, २१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्या पात्र मुलींच्या प्रवेशावरही प्रश्नचिन्ह आहे. त्या योजनेसाठी पात्र असूनही नवीन लाभार्थींचा समावेश सध्या होत नसल्याने या योजनेचा भविष्यातील स्वरूप काय असेल, हा प्रश्न महिलांमध्ये निर्माण झालाय. मात्र प्रशासनाकडून सर्वांना आवाहन करण्यात आलंय की ज्यांनी अर्ज केला आहे, त्यांनी त्यांचा लाभ चालू ठेवण्यासाठी ई-केवायसी नक्की पूर्ण करावी.

Comments are closed.