मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत करण्यात आलेल्या ऑनलाइन ई-KYC प्रक्रियेत झालेल्या चुकांमुळे नागपूर जिल्ह्यातील तब्बल १ लाख ४ हजारांहून अधिक महिलांचे लाभ अडचणीत सापडले आहेत.
सदोष माहिती भरली गेल्याने अनेक बहिणींची नावे योजनेतून तात्पुरती बाद झाली असून, या प्रकरणांची पडताळणी अंगणवाडी सेविकांकडे सोपवण्यात आली आहे.
शासनाने जिल्हास्तरावर महिला व बालविकास विभागामार्फत लाभार्थ्यांच्या याद्या पाठवल्या असल्या तरी, अंगणवाडी सेविकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने महिलांना कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. नागपूर शहरात ई-KYC चुकीमुळे सुमारे २५ हजार बहिणींचा जानेवारीचा हप्ता थांबला, तर जिल्ह्यात हा आकडा १.०४ लाखांपर्यंत पोहोचला आहे.
याशिवाय, काही प्रकरणांत महिलांच्या अर्जावर पुरुषांचे आधार क्रमांक जोडले गेल्याचे आढळून आले असून, अशा ५४९ लाभार्थ्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे. तसेच वयोमर्यादेच्या निकषांमुळे ६५ वर्षांवरील व २१ वर्षांखालील अनेक महिलांचाही हप्ता रोखण्यात आला आहे.
चुकीची माहिती भरलेल्या पण निकषांनुसार पात्र असलेल्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडे हमीपत्र व आधार सादर करून प्रत्यक्ष पडताळणी करून घेण्याचे आवाहन महिला व बालविकास विभागाने केले आहे.

Comments are closed.