राज्यात मुंबईसह २९ महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असतानाही ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना दिलासा मिळाला आहे. मतदानाआधीच डिसेंबर २०२५ चा हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांत जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

मुळात दोन महिन्यांचा (नोव्हेंबर–डिसेंबर किंवा डिसेंबर–जानेवारी) हप्ता एकत्र देण्याची चर्चा होती. मात्र, जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट मज्जाव केला आहे. त्यामुळे सरकारकडून केवळ डिसेंबर महिन्याचाच नियमित हप्ता वितरित करण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, आदर्श आचारसंहिता लागू असताना या योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल; परंतु अग्रिम लाभ देणे किंवा नवीन लाभार्थी निवडणे शक्य नाही. मुख्य सचिवांचा अहवाल व निवडणुकांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन हे निर्देश देण्यात आले आहेत.
जानेवारीचा हप्ता कधी मिळणार?
जुलै २०२४ पासून ‘लाडकी बहीण’ योजनेचा निधी नियमितपणे वितरित केला जात आहे. मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान दोन महिन्यांचे हप्ते एकत्र दिल्याने विरोधकांनी टीका केली होती. यावेळीही नोव्हेंबर–डिसेंबरचे हप्ते एकत्र देण्यावर आक्षेप घेण्यात आला आणि काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
या पार्श्वभूमीवर सरकारने फक्त डिसेंबर महिन्याचाच नियमित हप्ता जमा केला असून जानेवारीचा अग्रिम हप्ता देण्यात आलेला नाही. जानेवारीचा हप्ता नेमका कधी मिळेल, याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किंवा फेब्रुवारी महिन्यात हा निधी वितरित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लाभार्थी महिलांनी आपले बँक खाते व DBT स्टेटस तपासावे.

Comments are closed.