‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेवरून बुधवारी विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चकमक रंगली. राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोमणे मारत, “योजना आणणारे आता पहिल्या क्रमांकाच्या खुर्चीत नसून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेत,” अशी टीका केली.
त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी लगेच प्रत्युत्तर देत, “आज पहिल्या क्रमांकावरची व्यक्ती (देवेंद्र फडणवीस) नाही, त्यामुळेच तुम्ही हे बोलत आहात,” असे म्हणत सभागृहात हास्यकल्लोळ उडवला.
देसाई यांनी पुढे सारवासारव करत, “हे आम्ही नव्हे, मुख्यमंत्र्यांनीच पूर्वी म्हटले होते,” असे सांगितले. त्यानंतर पुन्हा पाटील यांनी पलटवार करत, “योजना आणणारे पहिल्या वरून दुसऱ्या क्रमांकावर जाणे म्हणजे महाराष्ट्राचे नुकसान,” असा टोला मारला. यावर देसाई म्हणाले, “क्रमांकांची अदलाबदल कायमच होत असते; शिंदे साहेब कायम दुसऱ्याच क्रमांकावर राहतील असे नाही,” अशा शब्दांत त्यांनी चर्चेला रंगत आणली.
दरम्यान, मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, अॅप-पोर्टलवर आलेल्या तब्बल २ कोटी ६३ लाख अर्जांची छाननी पूर्ण झाली असून २० लाख अर्ज अपात्र, तर २ कोटी ४३ लाख महिला पात्र ठरल्या आहेत. आचारसंहितेमुळे प्रक्रिया थांबली होती, मात्र ई-केवायसीचे काम ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जर कुठे पुरुषांनी गैरफायदा घेतला असेल तर खात्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
योजनेतील त्रुटींवर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी सभात्याग केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी ही लक्षवेधी सूचना मांडत घोटाळ्याची चौकशी आणि श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी केली होती.

Comments are closed.