मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसीचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चिंतेचा विषय ठरला होता. अनेक महिलांची ई-केवायसी चुकली होती, तर काहींची तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रिया अपूर्ण राहिली होती. मात्र, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना मोठा दिलासा देणारी आनंदाची बातमी जाहीर केली आहे. ज्या महिलांची ई-केवायसी राहिली आहे किंवा चुकीची झाली आहे, त्यांना पुन्हा दुरुस्तीची संधी देण्यात येणार आहे.

मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, ई-केवायसीसाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, या कालावधीत अनेक महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याने किंवा तांत्रिक अडचणींमुळे त्यांची केवायसी पूर्ण झाली नव्हती. परिणामी काही महिलांचे हप्ते थांबण्याची भीती निर्माण झाली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने आता ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकली आहे किंवा अद्याप झाली नाही, त्यांच्यासाठी ही प्रक्रिया अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. अंगणवाडी सेविका थेट घरी किंवा केंद्रावर येऊन कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करतील. त्यामुळे महिलांना कार्यालये किंवा केंद्रांमध्ये धावपळ करण्याची गरज भासणार नाही.
दरम्यान, अनेक महिला आणि सामाजिक संघटनांकडून ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा ऑनलाईन सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती, जेणेकरून अधिक पारदर्शकता राहील. मात्र, सध्या शासनाने ऑफलाईन पडताळणीचाच पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
या निर्णयाबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) येत्या १ ते २ दिवसांत जाहीर होण्याची शक्यता असून, जीआर निघताच प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होईल. त्यामुळे लाडक्या बहिणींनी घाबरून न जाता, आधार कार्ड, बँक पासबुक आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर ही आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.