सिल्लोड तालुक्यातील सुमारे २२ हजार शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. केवायसी प्रक्रिया पूर्ण करून महिना झाला असला तरी, अद्याप त्यांच्या खात्यात अनुदान जमा झालेले नाही. त्यामुळे हे शेतकरी बँका आणि तहसील कार्यालयांच्या फेऱ्या मारत आहेत.
सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. पंचनामे करून सादर केलेल्या अहवालानुसार, ६३,६१८ शेतकऱ्यांसाठी ४७ कोटी ८० लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी करण्यात आली. त्यातील ४८,६१५ शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली होती, आणि त्यापैकी २६,०५६ शेतकऱ्यांच्या खात्यात २० कोटी ८७ लाख रुपये जमा झाले. मात्र, उर्वरित २२,५५९ शेतकऱ्यांना महिना उलटूनही १६ कोटी ७९ लाख रुपये मिळालेले नाहीत.
शासकीय पारदर्शकतेसाठी दरवर्षी अनुदानासाठी केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, अनेक शेतकरी अजूनही वंचित आहेत. काही तलाठ्यांनी जुन्याच याद्या वापरल्यामुळे आणि नवीन वारसा हक्काने आलेले शेतकरी समाविष्ट न केल्यामुळे अनेकांना अनुदान मिळत नाही.
प्रशासनाचे आश्वासन
जे शेतकरी पात्र आहेत आणि ज्यांनी ई-पिक पाहणी केलेली आहे, त्यांना लवकरच अनुदान मिळेल, असे तहसीलदार संजय भोसले यांनी सांगितले. तसेच, वंचित शेतकऱ्यांची यादी तयार करून त्यांनाही लाभ मिळावा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
शेतकऱ्यांसाठी सूचना
आत्तापर्यंत ६३,६१८ पैकी ४८,६१५ शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली आहे, तर अजून १५,००० शेतकऱ्यांची प्रक्रिया बाकी आहे. महसूल प्रशासनाने सर्व लाभार्थ्यांना तत्काळ सेतू सुविधा केंद्र किंवा तलाठ्याकडे जाऊन केवायसी करण्याचे आवाहन केले आहे.