महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षकांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.
पालिका शाळांमधील एकूण ३५ शिक्षकांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता, त्यापैकी तब्बल २५ शिक्षक पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले असून हा निकाल लक्षवेधी ठरला आहे.
इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या या शिक्षकांनी दैनंदिन शालेय कामकाज सांभाळत नियोजनबद्ध अभ्यास केला. पाच शिक्षकांनी तर दोन्ही स्तरांच्या (इयत्ता १–५ व ६–८) परीक्षा देत यश मिळवले. सामान्यतः या परीक्षेचा निकाल अत्यल्प टक्केवारीत लागतो; मात्र केडीएमसी शाळांमधील सुमारे ६० टक्के शिक्षकांनी पहिल्याच प्रयत्नात पात्रता मिळवून दिली आहे.
प्रशासन व शिक्षण विभागाच्या प्रोत्साहनासोबतच शिक्षकांच्या मेहनतीमुळे हे यश शक्य झाल्याची भावना यशस्वी शिक्षकांनी व्यक्त केली असून, पालिका शाळांच्या गुणवत्तेचा हा ठोस पुरावा मानला जात आहे.

Comments are closed.