कल्याण-डोंबिवली महापालिकेतील (Kalyan Dombivli Municipal Corporation) प्रलंबित नोकरभरती प्रक्रियेला अखेर वेग आला असून, ६ ते ११ एप्रिल दरम्यान पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेली ही भरती प्रक्रिया निवडणूक आचारसंहितेमुळे थांबली होती; मात्र आता ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यासाठी प्रशासनाकडून पोलिस बंदोबस्तासह आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून, कल्याणमधील अत्रे रंगमंदिर येथे छाननी प्रक्रिया पार पडणार आहे.

महापालिकेतील रिक्त जागा, वाढता कामाचा ताण आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या निवृत्त्या लक्षात घेता ही भरती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. नव्या आकृतिबंधानुसार एकूण १,०९६ जागांना मंजुरी मिळाली असून, त्यापैकी ४९९ कर्मचारी २७ गावांमधून समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच ४९० नव्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. सध्या अनेक कर्मचाऱ्यांवर एकाच वेळी तीन-चार विभागांची जबाबदारी असल्याने कामकाजावर ताण वाढला आहे.
भरती प्रक्रियेत Tata Consultancy Services (TCS) कंपनीच्या माध्यमातून पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. कागदपत्र पडताळणीनंतर पात्र उमेदवारांना मेडिकल तपासणी आणि चारित्र्य पडताळणी प्रक्रियेतून जावे लागणार आहे. अपात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी सुमारे दीड महिन्यांचा कालावधी दिला जाईल.
पोलिस पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांना जॉइनिंग लेटर देण्यात येईल आणि पुढील दीड महिन्यांत हे उमेदवार महापालिकेच्या सेवेत रुजू होतील, असा प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळे लवकरच सुमारे १,००० कर्मचाऱ्यांची फौज तयार होऊन महापालिकेच्या कामकाजाला मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments are closed.