कर्नाटकमध्ये आरोग्य सेवेत मोठ्या प्रमाणावर भरती सुरू होणार असून, एका महिन्यातच डॉक्टर, परिचारिका आणि फार्मासिस्टची रिक्त पदे भरण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडुराव यांनी विधानसभेत याची माहिती दिली.
विधिमंडळ अधिवेशनातील प्रश्नोत्तर तासात आमदार दोड्डनगौडा पाटील यांनी आरोग्य विभागातील रिक्त जागांकडे लक्ष वेधले. त्यावर मंत्री गुंडुराव म्हणाले की, 337 तज्ज्ञ डॉक्टर आणि 250 वैद्यकीय अधिकाऱ्यांची कंत्राटी भरती मंजूर झाली आहे. याशिवाय सरकारी कोट्यातून 1,500 डॉक्टरांची भरती प्रक्रिया सुरू आहे.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टरांना एक वर्षाची अनिवार्य सरकारी सेवा देण्याची योजना आहे. वित्त विभागाने 120 तज्ज्ञ व 100 वैद्यकीय अधिकाऱ्यांची थेट भरती करण्यासही हिरवा कंदील दिला आहे.
तज्ज्ञ डॉक्टरभरतीसंबंधीचा खटला उच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे. राज्यभरातील आरोग्य सुविधांसाठी 600 नर्सिंग अधिकारी, 400 प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि 400 फार्मासिस्ट कंत्राटी पद्धतीने घेतले जात आहेत. गुंडुराव यांनी सांगितले की, आवश्यक ठिकाणी समुपदेशनाद्वारे ही पूर्ण प्रक्रिया महिन्याभरात पूर्ण केली जाईल.
यावेळी भाजप आमदार सुनीलकुमार आणि अरग ज्ञानेंद्र यांनीही काही सूचना मांडल्या.
प्रतिनियुक्ती रद्द होणार
विविध विभागांत प्रतिनियुक्तीवर गेलेल्या आरोग्य विभागातील डॉक्टर व फूड सेफ्टी ऑफिसर्सना पुन्हा आरोग्य विभागात परत बोलावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आवश्यक ठिकाणी त्यांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहितीही गुंडुराव यांनी दिली.

Comments are closed.