इंदापूर तालुक्यातील कळंब येथे फडतरे नॉलेज सिटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य नोकरी मेळाव्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांतील इंदापूर, बारामती, फलटण, माळशिरस, श्रीगोंदा व पंढरपूर तालुक्यातील एकूण ११२७ विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाले होते. त्यापैकी ८१३ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली.
स्व. साहेबराव फडतरे यांच्या ४४ व्या पुण्यस्मरणानिमित्त या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात डिप्लोमा इंजिनिअरिंग, फार्मसी, आयटीआय, बीबीए, एमसीए तसेच दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मेळाव्यात टाटा मोटर्स, महिंद्रा, भारत फोर्ज, पियाजो व्हेईकल्स, फियाट, कमिन्स, नॅशनल इंडस्ट्रिज, शिवप्रसाद डेअरी, नेचर डिलाईट डेअरी, सोनाई डेअरी, फडतरे इंजिनिअरिंग वर्क्स आणि ए.सी.एस. इंडस्ट्रीज यांसारख्या कंपन्यांनी सहभाग घेतला. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन योग्य उमेदवारांची निवड केली.
यावेळी फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे, सचिव दत्तात्रेय फडतरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जय फडतरे, कल्याणी फडतरे तसेच इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सोनाली देशमुख उपस्थित होत्या. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी प्लेसमेंट ऑफिसर उदय चव्हाण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य गणेश चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले.

Comments are closed.