पुण्यातील मॅडर्न महाविद्यालयावर जातीवादाच्या गंभीर आरोपांची छाया! नंदुरबारसारख्या गरीब आदिवासी जिल्ह्यातून यूकेपर्यंत शिक्षणाचा कठीण प्रवास पार केलेल्या प्रेम बिऱ्हाडे या तरुणाला नोकरीसाठी आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्राच्या तपासणीसाठी महाविद्यालयाने जात विचारली.
विशेष म्हणजे, जेव्हा प्रेम लंडनमध्ये शिक्षण घेत होता, तेव्हा त्याच महाविद्यालयाने प्रमाणपत्र तपासणी करून दिले होते. आता नोकरीसाठी त्याच प्रमाणपत्राची मागणी केली असता महाविद्यालयाने नकार दिला, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
प्रेम बिऱ्हाडे यांच्यासाठी हा अनुभव जातीय भेदभावाचे ज्वलंत उदाहरण आहे. प्रचंड सामाजिक आणि आर्थिक अडथळे पार करून आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या तरुणाला फक्त त्याच्या जातीमुळे नोकरी गमवावी लागली. हे प्रकरण फक्त एका विद्यार्थ्याचे नाही, तर अशाच अनेक दलित तरुणांची परिस्थिती दर्शवते, ज्यांची महत्त्वाकांक्षा जातीय भेदामुळे बुडवली जाते.
महाविद्यालयाचे म्हणणे वेगळे आहे. प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख कधीच केला गेलेला नाही आणि शैक्षणिक प्रमाणपत्र तपासणे हे पूर्णपणे संस्थात्मक नियम आणि शिस्तभंगाच्या विचारांवर आधारित आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर चुकीची माहिती पसरवून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रेम बिऱ्हाडे म्हणतात, “कॉलेजने मान्य केले की लंडनमधील कंपनीकडून ई-मेल मिळाला होता. मात्र डॉक्युमेंट तपासणीसाठी संपर्क साधला असता, ‘तुझी जात कोणती?’ असा प्रश्न विचारला गेला. शेवटी मुख्याध्यापिकांच्या सूचनेनुसार मला मदत न करण्याचा निर्णय झाला.”
