आतापर्यंत आखाती देशांकडे मोठ्या संख्येने जाणारे भारतीय कामगार आता रशियाकडे नव्या संधींच्या दृष्टीने पाहू लागले आहेत. युक्रेनसोबत सुरू असलेल्या दीर्घ युद्धामुळे आणि देशातील तरुण लोकसंख्या झपाट्याने घटत असल्याने रशियामध्ये प्रचंड प्रमाणात कामगार टंचाई निर्माण झाली आहे. याचाच फायदा भारतीय कामगारांना होताना दिसत आहे.

कन्स्ट्रक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, खाणी, तसेच तेल-गॅस रिफायनरीसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये रशियाला मोठ्या प्रमाणावर भारतीय मनुष्यबळाची गरज आहे. परिणामी, गेल्या चार वर्षांत रशियात कामासाठी जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत सुमारे ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आकर्षक पगार आणि भरपूर सुविधा
रशियामध्ये एका सामान्य मजुरालाही किमान ५० हजार रुपये मासिक पगार दिला जात आहे. अनुभव आणि ओव्हरटाइमच्या आधारे हे उत्पन्न १.५ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते. तर आयटी व इंजिनिअरिंग क्षेत्रातील तज्ज्ञांना १.८ लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळत आहे. विशेष बाब म्हणजे खाणी, रिफायनरी आणि ऑईलफिल्ड्समध्ये काम करणाऱ्यांना अनेक कंपन्या राहणं आणि जेवण पूर्णपणे मोफत देत असल्याने मोठी बचत शक्य होते.
कोणत्या कामांना आहे सर्वाधिक मागणी?
सध्या रशियामध्ये ब्लू-कॉलर नोकऱ्यांसाठी मोठी भरती सुरू आहे. वेल्डर, सुतार, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर, फॅक्टरी ऑपरेटर यांसारख्या कामांसाठी भारतीय कामगारांना प्राधान्य दिले जात आहे. विशेषतः पश्चिम बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथील कामगार मोठ्या संख्येने रशियाकडे वळताना दिसत आहेत.
रशियाला भारतीय कामगारांची गरज का?
रशियाची लोकसंख्या वेगाने वृद्ध होत असून काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या तरुण वर्गाची कमतरता आहे. त्यातच युक्रेन युद्धामुळे स्थानिक तरुणांची मोठ्या प्रमाणावर लष्करामध्ये भरती झाली आहे. रशियन श्रम मंत्रालयाच्या माहितीनुसार, या दशकाच्या अखेरीस रशियाला सुमारे १.१ कोटी अतिरिक्त कामगारांची गरज भासणार आहे. फक्त २०२४ मध्येच ७२ हजार भारतीयांना रशियाने वर्क परमिट दिले, जे एकूण विदेशी कामगार कोट्याच्या सुमारे एकतृतीयांश आहे.
फसवणूक टाळा; अधिकृत मार्गानेच वर्क व्हिसा घ्या
रशियात नोकरीसाठी जाण्यापूर्वी फसवणुकीपासून सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. भारत सरकारने परवानगी दिलेल्या नोंदणीकृत भर्ती एजन्सीमार्फतच अर्ज करा. रशियन गृह मंत्रालयाकडून जारी केलेले इनव्हिटेशन लेटर वर्क व्हिसासाठी अत्यावश्यक आहे. त्यासोबत पासपोर्ट, मेडिकल सर्टिफिकेट (HIV चाचणीसह), पोलीस क्लिअरन्स आणि शैक्षणिक कागदपत्रे लागतात. व्हिसा शुल्क साधारण २,००० ते १०,००० रुपयांपर्यंत असून, व्हिसा मिळण्यास ७ ते २० दिवसांचा कालावधी लागू शकतो.
एकंदरीत, उच्च पगार, मोफत सुविधा आणि सुरक्षित वर्क परमिट प्रक्रियेमुळे रशिया सध्या भारतीय कामगारांसाठी मोठी संधी ठरत आहे. योग्य आणि अधिकृत मार्ग अवलंबल्यास ही संधी तुमचं आयुष्य बदलू शकते.

Comments are closed.