इंजिनीअरिंग प्रवेशासाठी महत्त्वाची असलेली जेईई मेन्स परीक्षा आज बुधवार (२८) आणि उद्या गुरुवार (२९ जानेवारी) रोजी पार पडणार आहे. या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रे नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडून अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी जेईई मेन्स परीक्षा अनिवार्य आहे. २८ जानेवारी रोजी बीई व बीटेक अभ्यासक्रमांसाठी परीक्षा दोन सत्रांत घेतली जाणार आहे. पहिला सत्र सकाळी ९ ते दुपारी १२, तर दुसरा सत्र दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत होईल.
बी.आर्च आणि बी. प्लॅनिंग अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र पेपर्स घेण्यात येणार आहेत. ही परीक्षा देशातील विविध शहरांमध्ये तसेच परदेशातील १५ शहरांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र व तारखेची माहिती आधीच देण्यात आलेली आहे.
या परीक्षेचा पहिला टप्पा २१ ते २४ जानेवारीदरम्यान पार पडला असून, जेईई मेन्स परीक्षा दरवर्षी जानेवारी आणि एप्रिल अशा दोन सत्रांत घेतली जाते. विद्यार्थ्यांना एक किंवा दोन्ही सत्रांना बसण्याची मुभा असते. दोन्ही सत्रांना बसल्यास ज्या सत्रात अधिक गुण मिळतील, ते प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातात.
आयआयटींमध्ये प्रवेशासाठी जेईई अॅडव्हान्स पात्रतेसाठी जेईई मेन्स उत्तीर्ण होणे आवश्यक असून, जेईई मेन्समुळे देशातील अनेक नामांकित इंजिनीअरिंग कॉलेजांचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी खुले होतात.

Comments are closed.