जळगाव जिल्ह्याने आज उद्योजकतेचा नवा आदर्श उभा केला आहे. नोकरीसाठी धडपड करणाऱ्यांच्या रांगेत न थांबता, जिल्ह्यातील १,६८३ तरुणांनी स्वतःचे उद्योग सुरू करत थेट नोकरी देणारे बनण्याचा धाडसी निर्णय घेतला. गेल्या पाच वर्षांत या युवकांनी ५,८३९ पेक्षा अधिक रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत.
पंतप्रधान व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्हा उद्योग केंद्राच्या आर्थिक पाठबळामुळे हे स्टार्टअप्स आकाराला आले. उत्पादन, सेवा, व्यापार तसेच कृषीपूरक उद्योगांमध्ये या तरुणांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. लहान उद्योगांची सुरुवात करून इतरांसाठीही रोजगार उभा करण्याचे धाडस या युवकांनी दाखवले.
या योजनांची खास बाब म्हणजे उद्योग सुरू करण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. उत्पादन उद्योगांसाठी सुमारे ५० लाख रुपये, तर सेवा उद्योगांसाठी २० लाख रुपयांपर्यंत प्रकल्प खर्च मान्य असून, प्रवर्गानुसार १५ ते ३५ टक्के अनुदान मिळते.
२०२५–२६ या आर्थिक वर्षात एकूण २,९१४ प्रकरणे मंजुरीसाठी असून, त्यापैकी ४१४ प्रकरणांना मंजुरी मिळाली आहे. प्रलंबित कर्जप्रकरणे लवकर मार्गी लावण्यासाठी बँक अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
युवक-युवतींनी स्वयंरोजगारासाठी पुढे यावे, जिल्हा उद्योग केंद्रात अर्ज व माहिती उपलब्ध असून तालुकानिहाय कर्ज मेळावे लवकरच आयोजित केले जाणार आहेत, असे आवाहन रोहन घुगे यांनी केले आहे.

Comments are closed.