अल्पमुदतीचे अभ्यासक्रम की ‘डबल शिक्षण’? आयटीआय विद्यार्थ्यांचीच मक्तेदारी! | Short-Term Courses Dominated by ITI Students!

Short-Term Courses Dominated by ITI Students!

युवकांना उद्योगसुसंगत व रोजगाराभिमुख कौशल्ये देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमां’ला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात या अभ्यासक्रमांचा लाभ अपेक्षित घटकांपर्यंत पोहोचत नसल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. या अभ्यासक्रमांत प्रवेश घेणाऱ्यांमध्ये आयटीआयमध्ये शिकणारे किंवा आयटीआय पूर्ण केलेले विद्यार्थीच आघाडीवर असून, त्यामुळे एकाच ट्रेडचे दुहेरी शिक्षण सुरू असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.

Short-Term Courses Dominated by ITI Students!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी या योजनेचा गाजावाजा करत प्रारंभ करण्यात आला. दरमहा १ ते ५ हजार रुपये शुल्क, २५ टक्के जागा संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी आणि उर्वरित जागा बाह्य उमेदवारांसाठी अशी रचना करण्यात आली. पात्रतेमध्ये आयटीआयचे विद्यमान व उत्तीर्ण विद्यार्थी, तसेच दहावी, बारावी, पदविका किंवा पदवी शिकणाऱ्यांचा समावेश करण्यात आला. मात्र या निकषांचा फायदा घेत आधीच उच्च स्तरावरील ट्रेडमध्ये प्रशिक्षण घेतलेले किंवा शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेले प्रशिक्षणार्थी, कमी स्तरावरील अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांत प्रवेश घेत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

पहिल्या टप्प्यातील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत ५४,२१७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, यापैकी २५,४३७ म्हणजेच सुमारे ४७ टक्के विद्यार्थी आयटीआय पार्श्वभूमीचे आहेत. उर्वरित २८,७८० बाह्य उमेदवार असून नाशिक, यवतमाळ, अमरावती, नांदेड यांसारख्या जिल्ह्यांत प्रवेशसंख्या मोठी आहे. परिणामी कौशल्यवृद्धीऐवजी अनावश्यक व दुहेरी प्रशिक्षणाचा प्रकार वाढत असून, योजनेचे मूळ उद्दिष्टच धाब्यावर बसले आहे.

इलेक्ट्रिशियन, सीएनसी ऑपरेटर, वेल्डिंग, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, सोलार पीव्ही इन्स्टॉलेशन यांसारखे ट्रेड आयटीआयमध्ये आधीच एक ते दोन वर्षांच्या कालावधीत शिकवले जातात. तरीही हेच अभ्यासक्रम पुन्हा अल्पमुदतीच्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील प्राचार्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

या योजनेचा मूळ उद्देश शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणानंतरही रोजगार न मिळालेल्या, कौशल्यविरहित युवकांना प्रशिक्षण देण्याचा होता. मात्र प्रत्यक्षात आधीच प्रशिक्षण घेतलेले युवकच पुन्हा या अभ्यासक्रमांत सहभागी होत आहेत. डेटा एंट्री ऑपरेटर, संगणक हार्डवेअर-नेटवर्किंग, आयटी व डिजिटल कौशल्यांशी संबंधित अभ्यासक्रमांत मात्र आयटीआयबाहेरील उमेदवारांचा सहभाग तुलनेने अधिक आहे. त्यामुळे नव्या कौशल्यांचा विस्तार करण्याऐवजी पारंपरिक ट्रेडमध्येच पुन्हा-पुन्हा प्रशिक्षण दिले जात असल्याची टीका होत आहे.

नवी दिल्लीतील प्रशिक्षण महासंचालनालयांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयटीआय विद्यार्थ्यांना किमान २४० तासांचे उद्योगसुसंगत अल्पमुदतीचे प्रशिक्षण देऊन उद्योगांच्या मागणीनुसार रोजगारक्षम मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयावर आहे. मात्र प्रत्यक्षात विभागीय हस्तक्षेप, प्रशासकीय अडथळे आणि दुय्यम बाबींना प्राधान्य दिल्यामुळे प्रशिक्षण व मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या उदासीनतेचा थेट परिणाम आयटीआय प्राचार्य व निदेशकांच्या कार्यक्षमतेवर होत असून, विनाकारण लादलेल्या योजनांमुळे प्रशिक्षण यंत्रणेची दिशा भरकटत चालल्याची गंभीर बाब पुढे येत आहे.

Comments are closed.