पुरंदरमध्ये भव्य आयटी पार्कची घोषणा; दीड हजार एकरावर उभारणार मोठा प्रकल्प! | IT Park Planned on 1500 Acres Purandar!

IT Park Planned on 1500 Acres Purandar!

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात भव्य आयटी पार्क उभारण्याच्या प्रकल्पाला आता अधिकृत गती मिळाली आहे. पुण्यातील आयटी कंपन्यांचे परराज्यात होणारे स्थलांतर रोखण्यासाठी आणि नवीन रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. या आयटी पार्कसाठी सुमारे ५७२.५४ हेक्टर म्हणजेच जवळपास १४८४ एकर जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे सादर करण्यात आला आहे.

IT Park Planned on 1500 Acres Purandar!

या संदर्भात विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा झाली. आमदार Vijay Shivtare यांनी पुरंदर आयटी पार्कसंदर्भात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उद्योगमंत्री Uday Samant आणि उद्योग राज्यमंत्री Indranil Naik यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रस्तावित जागेचे हस्तांतरण करण्यासाठी महसूल विभागाकडे अधिकृत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

या प्रकल्पाला यापूर्वी २४ जुलै २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी तत्वतः मान्यता दिली होती. त्यानंतर उपलब्ध जागेचा अहवाल मागवून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली. उद्योग विभागाने ३ एप्रिल २०२५ रोजी उच्चस्तरीय बैठक घेऊन प्रस्ताव पुढे पाठवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार १५ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रादेशिक कार्यालयाकडून उद्योग विभागाला प्रस्ताव प्राप्त झाला.

पुण्यातील आयटी कंपन्यांना वाहतूक कोंडीसारख्या अडचणींमुळे स्थलांतर करावे लागत असल्याने पुरंदरमध्ये आयटी पार्क उभारण्याची मागणी रास्त असल्याचे उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा अंतिम प्रस्ताव लवकरच कॅबिनेटसमोर मांडला जाईल आणि पुरंदर आयटी पार्कची घोषणा करण्यात येत असल्याचेही स्पष्ट केले.

दरम्यान या घोषणेनंतर आमदार विजय शिवतारे यांनी आनंद व्यक्त करत, पुरंदर तालुक्यातील आयटी पार्क प्रकल्पावर आता शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले. हा प्रकल्प लवकर मार्गी लागावा यासाठी पुढेही पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रस्तावित गाव व क्षेत्रफळ पुढीलप्रमाणे –

  • चांबळी – १८५.६८ हेक्टर
  • दिवे – १८८.८३ हेक्टर
  • कोडीत बु. – १२४.१ हेक्टर
  • कोडीत खु. – ७३.९३ हेक्टर
    एकूण क्षेत्रफळ: ५७२.५४ हेक्टर (सुमारे १४८४ एकर).

या प्रकल्पामुळे पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.