साताऱ्यासाठी सुवर्णसंधी! ११५ कोटींचे ‘सीट्रिपलआयटी’ आयटी सेंटर मंजूर! | ₹115 Crore IT Center Approved in Satara!

₹115 Crore IT Center Approved in Satara!

सातारा जिल्ह्यासाठी उद्योग व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणारा ११५ कोटी रुपयांचा ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अ‍ॅन्ड ट्रेनिंग’ (CIIIT – सीट्रिपलआयटी) प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर आला आहे. टाटा टेक्नॉलॉजीजने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हे आयटी सेंटर साताऱ्यात उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला असून, याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्राद्वारे कळवण्यात आली आहे.

₹115 Crore IT Center Approved in Satara!

साताऱ्यातील उद्योगविश्वाला नवे बळ देणाऱ्या आयटी पार्कनंतर आता ‘सीट्रिपलआयटी’ सेंटरमुळे औद्योगिकीकरणाला गती मिळणार आहे. लिंब खिंड–नागेवाडी परिसरात उभारल्या जाणाऱ्या नव्या आयटी पार्कसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू असून, टाटा टेक्नॉलॉजीजच्या या प्रस्तावामुळे राष्ट्रीय स्तरावर साताऱ्याची ओळख बळकट होणार आहे.

टाटा व राज्य शासनाच्या सहकार्याने हे केंद्र उभारले जाणार असून, त्यामुळे सातारा जिल्ह्यातील तरुणांना उद्योगांच्या गरजेनुसार एआय, इंडस्ट्री 4.0, अत्याधुनिक तंत्रज्ञान व रोजगाराभिमुख कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळणार आहे. कौशल्याधारित प्रशिक्षणाची सध्याची गरज लक्षात घेता, विद्यमान शिक्षणपद्धती उद्योगमानकांशी जुळत नसल्याने कुशल मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे टाटा टेक्नॉलॉजीजने नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर ‘सीट्रिपलआयटी’ केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

यापूर्वी टाटा टेक्नॉलॉजीजने कर्नाटक, तामिळनाडू, बिहार व आसाम येथे असेच कौशल्यविकास प्रकल्प यशस्वीपणे राबवले आहेत. तसेच महाराष्ट्रातील चंद्रपूर व गडचिरोली येथेही राज्य सरकारच्या सहकार्याने केंद्रे उभारण्यात आली आहेत. आता साताऱ्यात उद्योग 4.0 कौशल्यांची उणीव भरून काढण्यासाठी हे केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.

या केंद्रात अत्याधुनिक लॅब्स, प्रगत उपकरणे, सुविधा उन्नतीकरण, अभ्यासक्रम पुनर्रचना व नवे तंत्रज्ञान प्रशिक्षण यांचा समावेश असेल. केंद्र सुरू झाल्यानंतर दरवर्षी सुमारे ३,००० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल, असा अंदाज आहे. ११५ कोटींच्या एकूण प्रकल्प खर्चापैकी ९७.७५ कोटी रुपये टाटा टेक्नॉलॉजीज तर १७.२५ कोटी रुपये राज्य शासन उपलब्ध करून देणार आहे. पुढील तीन वर्षे प्रशिक्षणासाठी उद्योग भागीदारांकडून आर्थिक सहाय्य मिळणार असल्याने राज्य सरकारवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्रकल्पामुळे साताऱ्यातील स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी खुल्या होणार असून, आधुनिक उद्योगांसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार होणार आहे. “या प्रकल्पासाठी टाटा टेक्नॉलॉजीजला आवश्यक ते सर्व सहकार्य केले जात आहे. सरकारकडूनही सर्वतोपरी मदत दिली जाईल,” असे ना. शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री, यांनी स्पष्ट केले आहे.

Comments are closed.