ग्रामीण पोलिस भरतीचा रणसंग्राम; एका जागेसाठी १०० उमेदवार मैदानात! | Intense Competition in Rural Police Recruitment!

Intense Competition in Rural Police Recruitment!

अमरावती ग्रामीण पोलिस दलातील पोलीस शिपाई पदासाठीची प्रतीक्षा अखेर संपणार असून, २१४ रिक्त जागांसाठीची भरती प्रक्रिया ११ फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या भरतीसाठी तब्बल २१ हजार २०० उमेदवारांनी अर्ज केले असून, एका जागेसाठी सुमारे १०० उमेदवारांमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळणार आहे. खाकी वर्दी मिळवण्यासाठी तरुणांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे.

Intense Competition in Rural Police Recruitment!

भरतीच्या पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. मैदानी व शारीरिक चाचणीसाठी आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात असून, मैदानाची डागडुजी, धावण्याच्या ट्रॅकची आखणी तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून कडक निगराणी ठेवण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी पोलिस अधीक्षक विशाल आनंद स्वतः मैदानावर पाहणी करत असून, त्यांच्या थेट देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे कोणत्याही गैरप्रकारांना वाव राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

या भरती प्रक्रियेत २१४ पैकी ६४ पदे महिलांसाठी, तर १० पदे खेळाडूंसाठी राखीव आहेत. अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर उच्चशिक्षित तरुणांचा समावेश असल्याने स्पर्धा अधिक कठीण ठरणार आहे. ११ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या मैदानी चाचण्यांमध्ये उमेदवारांची शारीरिक क्षमता काटेकोरपणे तपासली जाणार आहे.

संपूर्ण भरती प्रक्रिया संगणकीय व ऑनलाइन पद्धतीने पारदर्शकपणे राबवली जाणार असून, उमेदवारांनी कोणत्याही अफवा, दलाल किंवा मध्यस्थांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. कोणाकडूनही पैशांची मागणी झाल्यास, तात्काळ पोलिस अधीक्षक कार्यालय किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments are closed.