“देशाच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ पायाभूत सुविधा पुरेशा नाहीत, तर सर्वात महत्वाची गरज आहे ती विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला विकसित करण्याची,” असे मत राजस्थानचे राज्यपाल व महाराष्ट्राचे सुपुत्र हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले. नांदेड येथे एका सत्कार समारंभात बोलताना त्यांनी भारताच्या प्राचीन शिक्षण परंपरेचे स्मरण करत आजच्या शिक्षण पद्धतीला नवदृष्टी देण्याचा आग्रह धरला.
राज्यपाल बागडे यांनी आपल्या भाषणात गुरुकुल शिक्षणपद्धतीचा विशेष उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, “आपल्या पूर्वजांनी रचलेली ही पद्धती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण – म्हणजे शारीरिक, बौद्धिक आणि नैतिक – विकासासाठी होती. त्या काळातील विद्यार्थी केवळ गणित, व्याकरण, धर्म, तत्त्वज्ञान यामध्येच नाही, तर संगीत, शस्त्रविद्या, कृषीशास्त्र यामध्येही पारंगत होत असत.”
ते पुढे म्हणाले की, आजच्या काळात विद्यार्थी फक्त पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित राहतात. मात्र, व्यावहारिक ज्ञानाचा अभाव त्यांना वास्तव जीवनात अनेक वेळा मागे टाकतो. त्यामुळे शाळा आणि विद्यापीठांनी आपल्या अभ्यासक्रमात जास्तीत जास्त व्यावसायिक व कृतीशील शिक्षणाचा समावेश करणे गरजेचे आहे.
राज्यपाल बागडे यांनी प्राध्यापक व शिक्षकांना विशेष आवाहन करत सांगितले की, “फक्त शिकवणे पुरेसे नाही, तर विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता, निर्णय घेण्याची वृत्ती, आणि समस्या सोडवण्याची सर्जनशीलता वाढविण्यावर भर द्या.” कारण हीच क्षमता त्यांना भविष्यात नवकल्पनांची दिशा दाखवू शकते.
“आपला देश जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. परंतु शिक्षणाची गुणवत्ता जर कमकुवत असेल, तर आपण या स्पर्धेत मागे पडू. त्यामुळे शिक्षण संस्थांनी आपली भूमिका राष्ट्रीय पुनर्बांधणीच्या दृष्टिकोनातून पार पाडली पाहिजे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
त्यानंतर त्यांनी खेळांचे महत्त्व अधोरेखित केले. “केवळ पुस्तकी अभ्यास पुरेसा नाही. प्रत्येक शाळेमध्ये मैदान असणे अनिवार्य आहे. कारण खेळातून विद्यार्थ्यांचा केवळ शारीरिकच नव्हे, तर बौद्धिक व सामाजिक विकास देखील होतो. त्यामुळे खेळांना शाळेच्या मुख्य अभ्यासक्रमाइतकंच महत्त्व द्या.”
शेवटी, राज्यपाल बागडे यांनी उपस्थित शिक्षक, प्राध्यापक, पालक व समाजप्रेमींना आवाहन केले की, ज्ञान ही केवळ स्वतःपुरती ठेवू नये, तर समाजात पसरवावी लागते. आपल्यातील प्रत्येकाने जबाबदारीने शिक्षणाच्या माध्यमातून देशासाठी योगदान द्यावे, म्हणजेच आपला भारत देश जगात सर्वोत्तम म्हणून नावारूपास येईल.
या प्रेरणादायी भाषणाने श्रोत्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आणि शिक्षणाच्या क्षेत्रात नवविचारांची मशाल पेटवण्याचे आवाहन बागडे यांनी केले.